पॉवर ऑफ डिटॅचमेंट
अटॅचचमेंट मुळे आपण बऱ्याचदा स्वतःला दु:खी करत असतो.कोणत्याही नात्यात आपली गरजेपेक्षा जास्त गुंतवणूक झाली की आपण त्या व्यक्तीकडून अवास्तव अपेक्षा ठेऊ लागतो किंवा आपला आनंद आपण त्या व्यक्तीवर अवलंबूनन ठेवतो.अशा वेळी समोरची व्यक्ती जर आपल्या मनासारखी वागली नाही,तर आपण स्वत:ला बऱ्याचदा दुःखी करताना दिसतो. त्यामुळे अटॅचचमेंट बरोबर परावलंबित्व व दुःख किंवा नाते तुटण्याची अनाठायी भीती आपल्याला वाटू लागते. नात्यामध्ये डिटॅच राहायचे मग नातीच कशाला निर्माण करायची,असा प्रश्न अनेक जण विचारतात,डिटॅचमेंट ही संकल्पना इथे नीट समजून घेण्याची गरज आहे .
डिटॅचमेंट म्हणजे समोरच्या व्यक्तीशी नाते तोडणे,त्या नात्यांबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या टाळणे किंवा भावनिक दृष्ट्या स्वतःला कोरडे ठेवणे नसून,स्वत:हाच स्वतःहाला तटस्थ पाहण्यास शिकणे होय…
अटॅचमेंटमुळे व्यक्ती कमजोर होते,भावनाविवश होते त्यामुळे स्वत:ची मनोशारिरीक ऊर्जा कमकुवत होताना दिसते. नात्यांमध्ये तू दुःखी तर मी दुःखी,तू सुखी तर मी सुखी म्हणजे एक व्यक्ती कमजोर झाली तर मी स्वतः ला कमजोर करणेच होय;कारण आमचे नाते फार घट्ट आहे असे बऱ्याच जणांना वाटते. माझ्या मते या चुकीच्या घट्ट मनोधारणा आपणच करून घेतल्या आहेत.
कोणत्याही प्रसंगामुळे एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचली, तर आपणही लगेच खचता काम नये. वस्तुतः आपण अशा प्रसंगात त्या व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा दिली पाहिजे. निरपेक्षपणे मदत केली पाहिजे .पण हे सगळं करण्यासाठी तेवढ्या दर्जाची मानसिक ताकद असणे फार आवश्यक आहे. अशा वेळी समोर आलेल्या प्रसंगाकडे किंवा त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीकडे तटस्थ पणे पाहू शकलो, तर आपले मन विचलित न होता आपल्या मनोशारिरीक,शाररिक उर्जेला अभाधित ठेऊन आपण दुसऱ्याला नक्कीच मदत करू शकतो. अशा वेळी समोरची व्यक्ती दुःखी झाली,तरी माझ्याकडे आनंदाचा पुष्कळ साठा असल्याने मी समोरच्या व्यक्तीकडे किंवा त्या अप्रिय घटनेकडे जाणीवपूर्वक तटस्थपणे पाहू शकतो.त्यामुळे माझी मानसिक ताकद किंचितही ढळत नाही.व माझ्याकडून समोरच्या व्यक्तीला भरपूर प्रमाणात सकारात्मक ऊर्जा मिळू शकते.प्रत्येक नातेसंबंधांची हीच गरज आहे. त्यामुळे ‘डिटॅचमेंट’म्हणजे कोरडेपणा नसून,स्वतः खंबीर व स्वावलंबी राहणे होय.त्याचबरोबर समोरच्या व्यक्ती जर राग,द्वेष,मत्सर,चिंता अशा नकारात्मक भावना किंवा तशी ऊर्जा माझ्याकडे परावर्तित करत असेल तर अशावेळी ती ऊर्जा स्वतःमध्ये धारण न करता तेवढ्याच ताकदीने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह मी जर समोरच्या व्यक्तीकडे परावर्तित केला किंवा पाठवला,तर माझ्यादृष्टीने हीच ‘डिटॅचमेंट’ होय.
डिटॅच होण्यामुळे आपण स्वतःचे मानसिक व भावनिक स्तरावर रक्षण तर करतोच आहोत. त्याच बरोबर आपल्यापेक्षा कमकुवत व्यक्तीला,मग ती कोणत्याही नात्यामधील व्यक्ती असो, तिला सक्षम व्हायला मदतच करणार आहोत .त्यामुळे लवकरच डिटॅच होऊन स्वतःकडे,परिस्थितीकडे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक नात्याकडे पाहा,त्यामुळे तुम्ही स्वतः खंबीर व सक्षम व्हाल साहजिकच नातीही तशीच होतील आणि टिकतील सुद्धा…
डॉ.मकरंद ठोंबरे