बरेचदा असे लक्षात येते की ,आपण स्वतःला आणि इतरांना क्षमा करू शकत नाही. कारण अनेक घटना कटू प्रसंग व कडू आठवणी आपण आपल्या मनामध्ये साठून ठेवलेल्या असतात बरेचदा अशा घटनांमुळे आपला अहंकार दुखावला गेल्यामुळे आपली स्व: प्रतिमा दुखावलेली असते,त्यामुळे आपणच आपल्याला अनेक आनंदी क्षणापासून वंचित ठेवत असतो. क्षमाशील होण्याअगोदर अजून एक महत्वाचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे, तो म्हणजे रोजच्या आयुष्यात गोष्टी सोडून देता येणे. (let go) हा दृष्टिकोन आत्मसाद करता येणे. आपल्याला हे जमले तर आपल्यामध्ये क्षमाशीलतेचे सामर्थ्य येण्याची शक्यता जास्त आहे असे मला वाटते.

let go करायचे म्हणजे नक्की काय करायचे असा प्रश्न साहजिकच अनेकांच्या मनात डोकावला असणार, let go म्हणजे एखादी गोष्ट सहजपणे व मनःपूर्वक सोडून देता येणे. किंवा त्याच्याकडे जाणीवपूर्वक किंवा तटस्थपणे पाहता येणे. आपले घरापासून-ऑफिस पर्यंत आणि नातेवाईक- मित्र-मंडळींबरोबर रोज अनेक मतभेद होत असतात.अशा वेळी कोणी चूक किंवा बरोबर असतेच असे नाही.कारण प्रत्येकाने केलेला विचार आणि मांडलेले मत हे स्वत:च्या हिताचे असू शकते हे आपण समजून घेतले पाहिजे, अशा वेळी समोरच्याचे मत आपल्या मतप्रहावाच्या विरुद्ध असेल आणि त्यामुळे आपण स्वतःला दुखावत असू तर त्याचा अर्थ आपल्याला आधी स्वतःला आणि समोरच्या व्यक्तीला त्याच्या गुण-दोषांसहित स्वीकारता आले नाही. प्रत्येकाचे विचार,भावना,मूल्य,संस्कार आणि पर्यायाने व्यक्तिमत्व भिन्न असल्याने आपल्याला आपली स्वीकार करण्याची पातळी नक्कीच उंचावण्याची गरज आहे. आपल्याला अशा प्रसंगाकडे आणि व्यक्तींकडे let go करता येणे आवश्यक आहे.

अनेकदा नाती निभावताना अनेकजण वाकड्यात जातात, टोमणे मारतात, द्विअर्थी बोलतात, मुद्दाम आपण दुखावले जाऊ अशा पद्धतीने वागतात किंबहुना आपल्याला त्रास व्हावा असाच त्यांचा हेतू असतो. मला वाटते दुसर्याबद्दल असे वाटणे, हे असे वाटणाऱ्या व्यक्तीच्या कमकुवतपणाचे लक्षण आहे. अशा वेळी आपण स्वतःचे रक्षण करायला शिकले पाहिजे. त्यासाठी let go करता येणे महत्वाचे आहे; पण अनेकांना let go करणे हे आपले स्वतःचेच कमकुवतपणाचे लक्षण आहे,असे वाटते. आपण भित्रे आहोत, आपण परिस्थिती व समोरच्या व्यक्तीला शरण जात आहोत, अशी त्यांची भावना होते. मात्र, let go योग्यवेळी स्वतःच्या मानसिक आरोग्याचे रक्षण करणे, हेच शहाणपणाचे आहे आणि तेच सर्वांच्या हिताचे ठरते. let go केल्यामुळे आपल्या मानसिक ऊर्जेचे संवर्धन होते. त्याचबरोबर ज्या गोष्टी माझ्या हातातच नाहीत, अशा गोष्टींमध्ये आपली शक्ती व्यर्थ दवडणेही हळूहळू थांबते. याचा परिणाम म्हणजे आपल्याला मन:शांती, आनंद, परिपूर्णतेची भावना अनुभवास मिळते.

आपल्या विचारांच्या, भावनांच्या व त्याला अनुरूप अशा वर्तनाच्या सीमारेषा आपल्याला माहित असणे फार आवश्यक आहे. हे एकदा नीट समजले की दुसऱ्या माणसाला बदलणे, स्वतःचे विचार दुसऱ्यावर लादणे किंवा दुसऱ्यांच्या विचारांच्या प्रभावाखाली येणे या सर्व गोष्टी हळूहळू थांबतात. ज्या गोष्टींवर माझंही नियंत्रण नाही अशा गोष्टी बदलण्याची व्यर्थ धडपड थांबते. याउलट माझी मन:शांती, माझे यश, माझे सुख कशामध्ये सामावलेले आहे या गोष्टींकडे जास्त लक्ष दिले जाते. दुसऱ्याच्या विचारांचा, भिन्नमतांचा आपण आदर व स्वीकार करायला शिकतो. व सर्वात शेवटी माझे हित कष्ट आहे हे उमजते.

चला तर मग भूतकाळातील कटू घटनांचा जुन्या मत प्रवाहांचा मनात घट्ट रुजून बसलेल्या चुकीच्या धरणांचा आधी स्वीकार करूयात, आणि त्याकडे जाणीवपूर्वक let go करून आधी स्वतः कडे आणि इतरांकडेही सहजतेने डोळसपणे पाहुयात. म्हणजे let go करण्याचे सामर्थ्य तुमच्यामध्ये निर्माण करण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवु शकणार नाही.

डॉ. मकरंद ठोंबरे.