” वेळीच द्या मदतीचा हात “

आपण हे जाणतोच की ‘टिन एजमध्ये’ जाणवणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक,कौटुंबिक बदल हे लक्षणीय असतात.जेव्हा एखादा मुलगा आत्महत्येसारखा पर्याय निवडतो त्यावेळी त्याची मानसिक अवस्था व त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. आज जगभरामध्ये भारतात सर्वाधिक ‘टिन एजर्स’ आत्महत्या करतात असा धक्कादायक निष्कर्ष एका सर्वेक्षणातून दिसून आले. वय वर्ष १५ ते २९ या वयोगटातील मुले-मुली या मार्गाचा अवलंब करतात असे सिद्ध झाले आहे. गेल्या काही वर्षात अंदाजे १७ हजार ‘टिन एजर्सनी’ आत्महत्या केलेली आहे ही आकडेवारी फारच चिंताजनक असल्याचे दिसून येते. आपल्याकडे मानसिक आरोग्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन आपली मानसिक आरोग्यविषयीची सतर्कता, शास्त्रीय माहिती व उपाययोजना या गोष्टींविषयी आपल्या सर्वांमध्ये दिसणारी अनास्था या सर्व गोष्टींसाठी कारणीभूत असल्याचे दिसून येते.
आत्ताची तरुण पिढी फार लहान वयापासून ‘स्ट्रेस प्रोन’ होताना दिसते. यात त्यांची फार चूक नाही,कारण सर्वत्र दिसणारी रॅट रेस ‘manipulation’ आयुष्यात यशस्वी होण्यासाठी करावी लागणारी कसरत ,पालकांच्या अपेक्षांचे ओझे ,आजूबाजूला दिसणारी प्रलोभने,आकर्षणे अशा अनेक गोष्टी याला कारणीभूत आहेत ;परंतु या सर्व गोष्टींचा यशस्वीपणे सामना करण्याचे मार्गदर्शन व मदत आपण त्यांना करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यातूनच आत्महत्येसारखा विघातक पर्याय निवडण्याअगोदरच त्यांना लागणारी सुयोग्य मदत व आधार मिळाला,तर त्याचा तरुण पिढीला नक्कीच उपयोग होईल अशी खात्री वाटते. पण त्यासाठी अशा मुलांकडे योग्य वेळी लक्ष देणे, त्यांची समस्या ओळखणे ‘कौन्सेलर’ किंवा मानसोपचारतज्ञाची मदत घेणे यामध्ये अजिबात संकोच व दिरंगाई करू नका. पण दूर्देवाने पालकांना व समाजातील इतर घटकांना त्याबद्दल तितकीशी आस्था आणि कळकळ आहे असे दिसून येत नाही. आत्महत्या करणाऱ्या ८८% मुलांमध्ये मानसिक आजाराची काहीतरी लक्षणे दिसून आली होती,परंतु त्यापैकी फक्त २३% मुलांनी कोणत्यातरी उपचार पद्धतीचा आधार घेतला होता, इतरांना मात्र या विषयी जाणीव नव्हती किंवा आपल्या पाल्याचे विचार, भावना, वर्तन या पातळ्यांमध्ये ‘abnormality’ दिसूनही त्यांनी तटस्थ व निष्क्रिय भूमिका घेतल्यामुळे ते काहीच करू शकले नाहीत. कोणताही आजार विकोपाला जाण्याअगोदर त्याची प्राथमिक लक्षणे दिसून येतील.

काही ठराविक आजार किंवा समस्या आलेल्या व्यक्ती आत्महत्येचा विचार करताना दिसतात ते पुढील प्रमाणे:
– विकोपाला गेलेले कोणतेही आजारपण
– आत्महत्येची कौटुंबिक पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्ती
– लैंगिक व शारीरिक शोषण
– दारू किंवा इतर अमली पदार्थांच्या व्यसन
– तीव्र मानसिक आजार
– कौटुंबिक कलह व अत्याचार
– कुटुंब व समाजाकडून वंचित व दुर्लक्षित
– तीव्र आर्थिक चणचण
– तीव्र डिप्रेशन व स्किझोफ्रेनिया
– बायपोलर व पर्सनॅलिटी डिसऑर्डर
– उत्तम शिक्षण होऊनही नोकरी न मिळणे.

वरीलपैकी कोणतीही समस्या असणाऱ्या व्यक्ती आपल्या कुटुंबात, आजुबाजूला किंवा ओळखीत असतील, तर त्यांच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. त्यांना तुमच्या मदतीची आधाराची, कौन्सेलिंगची किंवा वैद्यकीय उपचारांची गरज असू शकते .त्यांना वेळीच ओळखण्याचा प्रयत्न करा व मदतीचा हात पुढे करा.

डॉ.मकरंद ठोंबरे.