Friendship day च्या निमित्याने
“FRIENDSHIP”भी जरुरी हे…
आयुष्य जगताना अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजाबरोबर उत्तम आणि सक्षम नाती किंवा नातेसबंध आयुष्यात अस्तित्वात असणे ही सुद्धा माणसाची मुलभूत गरज आहे, असे मला वाटते. अनेक जण आयुष्यभर एका परफेक्ट नात्याच्या शोधात असताना मी पाहिलेले आहेत. बऱ्याचदा मला हवी तशी ‘परफेक्ट मॅच’ अशी व्यक्ती मिळणे मात्र महाकठीण आहे.
कुठलेही नाते म्हणले, की त्या नात्यासंबंधी किंवा नात्यामधील भूमिकेसंबंधी आपण पूर्वग्रहदूषित विचार करत असतो. मोठ्या भावाने मला आधार दिलाच पाहिजे, आई-वडिलांनी माझ्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्याच पाहिजेत. नात्यांमधील मागण्या नाती निर्माण होण्याअगोदरच आपल्या मनात तयार असतात. या नात्यामध्ये माझी भूमिका मी कशी निभावणार आहे, याविषयी आपण फारसे बोलायला तयार नसतो. या सर्व नात्यांच्या भावनिक गुंत्यामध्ये न अडकता एका निकोप, निखळ, परिपूर्ण, नितळ असे नाते आहे, ते म्हणजे “मैत्रीचे नाते”.
मैत्री ही आयुष्यभर साथ देणारी ठरू शकते. त्याचे प्रमुख कारण आहे, ते म्हणजे मैत्रीची आदर्श प्रतिमा कुणी आपल्या मनामध्ये बिंबवलेली नसते. मित्र आपण स्वतः निवडतो किंवा पारखून घेत असतो. मित्राविषयी कुठल्याही चुकीच्या मनोधारणा आपण आधीच तयार केलेल्या नसतात. त्यामुळेच या मैत्रीपूर्ण नात्यामध्ये समोरच्या व्यक्तीचा विनाअट, विनाशर्त स्वीकार करणे सहज शक्य होऊ शकते. अशामुळे समोरील व्यक्तीचा गुणदोषांसह जाणीवपूर्वक स्वीकार करता येतो. मैत्रीला जातीचा, वयाची, धर्माची, संस्कृतीची कशाचीच अट नाही. कोणत्याही दोन व्यक्तींमध्ये सक्षम व सकारात्मक ऊर्जेची देवाणघेवाण होऊ शकते, तेव्हा मैत्रीच्या नात्यांमध्ये खूप मोकळेपणा असतो. कृत्रिम शिष्टाचार अजिबात नसतो. इथे फार विचार करून बोलावे लागत नाही. समोरची व्यक्ती सर्वार्थाने समजून घेऊ शकते, हा फार मोठा आनंद आहे, असे मला वाटते.
आपण आपल्या आयुष्यात अस्तित्वात असलेल्या प्रत्येक नात्यात जर मैत्री आणु शकलो किंवा ते नाते मैत्रीपूर्ण करू शकलो तर फार आनंद निर्माण होईल. नात्यांमधील ओझी, ताणतणाव, अपेक्षांचे दबाव कमी होण्यास नक्कीच मदत होईल. इतर नात्यांमधील येणारी कर्तव्ये, जबाबदारी व त्यामुळे होणारी स्वत:ची घुसमट नक्कीच कमी होऊ शकेल.
उपचारांसाठी येणाऱ्या अनेक पेशंटचा अभ्यास केल्यावर मलाही असे लक्षात आले आहे, कि ज्यांना पुष्कळ मित्र-मैत्रिणी आहेत,त्या व्यक्ती अधिक समृद्ध व समाधानी आयुष्य जगताना दिसतात. परिणामी, त्यांचे मानसिक व पर्यायाने शारीरिक आरोग्य उत्तम राहते. ताणतणावांची निर्मिती कमी होते. ही माणसे अधिक कार्यशील व प्रयोगशील रहातात,आयुष्यभर काहीतरी नवीन गोष्टी करत राहतात, ज्यामुळे आयुष्य अर्थपूर्ण वाटू लागते.चला तर मग आजपासून आधी स्वतःशी आणि इतरांशी मैत्रीपूर्ण नाते जोपासायचे ठरवू या.
डॉ.मकरंद ठोंबरे.