कॉलेजियन्स आणि पालकत्व
आजकाल एकत्र कुटुंब पद्धती नाहीशी होताना दिसते. त्यामुळे विभक्त कुटुंबातच मुले वाढताना दिसतात. अशा कुटुंब पद्धतीचे काही फायदे सुरवातीला वाटले तरी व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने तोटाच जास्त होतो, असे माझे स्पष्ट मत आहे. घरातील आजी-आजोबांजवळ राहणारी मुले पाळणाघरात वाढणारी मुले यांमधील आत्मविश्वास, व्यक्तिमत्व, भावनिक परिपक्वता या स्तरांवर प्रचंड फरक जाणवतो. माझा पाळणाघराविषयी अजिबात राग नाही पण सोय यापेक्षा नंतर ती एक सवयच पालकांना होऊन बसते. त्यामुळे पालक व मुलांमध्ये नाते निर्माणच होत नाही. उलट मुले पाळणाघरातील काकुंशी attach होतात तेही पालकांना चालत नाही. इथपासूनच मुले व पालक नात्यामध्ये दुरावा येऊ लागतो,याचा परिणाम मुले पौगंडावास्थेमध्ये गेली की अचानक पालकांना जाणवतो. बऱ्याचदा वेळ निघुन गेलेली असते. त्यामुळे या प्रश्नांवर मार्ग काढायचा असेल, तर पालक व मुले यांमध्ये उत्तम नाते निर्माण होण्याची गरज आहे. व ते टिकवण्याची जबाबदारी पुढे पालक व मुले दोघांवरही आहे.
पालक व कॉलेजियन्स मुलांमधील नाते सक्षम होण्यासाठी उपयुक्त टिप्स:
एकमेकांसाठी जाणीवपूर्वक वेळ काढा:
तुम्ही कितीही Busy असाल तरी पालकांनी व मुलांनी रोज स्वतःसाठी व या नात्याचा विकास होण्यासाठी एकमेकांसाठी वेळ काढणे अत्यंत आवश्यक आहे. रोज एक वेळेचे जेवण तरी कुटुंबाने एकत्र घेतल्यास उत्तम प्रकारे संवाद व विचारांची देवाणघेवाण होऊ शकते.ज्यामुळे रोजच्या दिवसात काय घडले हेही तुम्हाला समजू शकेल. त्यामुळे रोज एकमेकांसाठी वेळ काढण्याचे मनापासून ठरवा.
काळानुसार आदर्श व मुल्ये:
आमच्यावेळी असं नव्हतं तसं नव्हत. वडिलांसमोर मान वर करून उभे राहण्याचीही आमची हिंमत नव्हती असे पालक सांगताना दिसतात. पण धाकामुळे पाल्य-पालक सबंध चांगले रहातात. असे मला अजिबात वाटत नाही. यापेक्षा पालक व मुले यामध्ये मित्रत्वाचे नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे एकमेकांविषयी आदर वृद्धिंगत होईल त्यामुळे पालकांनी बदलत्या काळानुसार मुलांमध्ये व सामाजिक परिस्थितीत झालेले बदल समजून व स्विकारून स्वतःला म्हणजेच आपल्या विचारांना अपग्रेड करणे गरजेचे आहे ज्यामुळे तुमची मुले तुमच्याशी कम्फर्टेबल होतील.
स्वयंशिस्त अंगीकारा:
मुलाने पहाटे उठून अभ्यास केला पाहिजे,सकाळी लवकर उठले पाहिजे हे सांगणारे पालक स्वतः उशिरा उठत तर मुले सकाळी कधीच अभ्यास करणार नाही त्यामुळे आपल्या मुलाने जे करावे असे आपल्याला वाटते ते आधी स्वत: अंगीकारून आधी केले मग सांगितले,या प्रमाणे उदाहरण व आदर्श घालून दिल्यास आपली मुले नक्कीच आपल्यासारखे करताना दिसतील. त्यामुळे परिवर्तनाची सुरवात आधी स्वयंशिस्तीने व्हायला हवी, असे मला वाटते.
मुलांचे निर्णय तुम्ही घेऊ नका:
कोणताही निर्णय घेताना तुमच्या मुलाला योग्य ती शास्त्रीय माहिती पुरवणे तुम्हाला आलेले अनुभव कथन करणे एवढेच तुमच्या हातामध्ये आहे. त्यानंतर कोणता निर्णय घ्यायचा याचे व्यक्ती स्वातंत्र्य मुलांना नक्कीच आहे. अशाने विचारशक्ती व निर्णयक्षमता यावर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे मुलांचे मार्गदर्शक होण्याचा प्रयत्न करा.
अतिरिक्त पैशाने प्रश्न सोडवू नका:
बरेच पालक स्वत: मुलांना वेळ देऊ शकत नाहीत त्यामुळे त्यांना अपराधी वाटते.याचे परिमार्जन म्हणून असे पालक मुलांचे अतिरिक्त लाड करतात. महागड्या वस्तू किंवा सुखसोयी उगीचच पुरवल्या जातात. तुम्ही मुलांना दिलेला वेळ व प्रेम आणि आधार याची किंमत कितीही पैसा दिला तरी होणार नाही त्यामुळे मुलांना गरजेइतकाच पैसा द्या व त्यापेक्षा जास्त आधार द्या ज्यामुळे मुले तुमची होतील.
स्वत:च्या व मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाला प्राधान्य द्या.
आपले व्यक्तिमत्व हे शारीरिकच नसून मानसिक व बौद्धिक स्तरावरही त्याचा विकास होणे आवश्यक आहे. शारीरिक तंदुरुस्तीपेक्षाही मानसिकदृष्ट्याही तंदुरुस्त राहणे आजच्या काळामध्ये अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी उत्तम स्व-प्रतिमा, संतुलित, भावनिक, बुद्धिमत्ता व सकारात्मक विचारसरणीचे पाठबळ असणे आवश्यक आहे.
तुम्ही मनापासून ठरवल्यास व प्रयत्न केल्यास उत्तम पालक-पाल्य सबंध नक्कीच निर्माण होतील याची मला खात्री आहे.
डॉ.मकरंद ठोंबरे.