” आनंददीप”

आज आपल्या सर्वांच्या आयुष्यात एका गोष्टीचा वारंवार अभाव दिसून येतोय आणि ती गोष्ट म्हणजे “आनंद” .खरोखरंच दुर्मिळ होत चाललाय,असं मला रोज जाणवत. समुपदेशनासाठी येणाऱ्या अनेकांना मी नेहमी एक प्रश्न विचारतो की तुम्ही का जगता? तुमच्या आयुष्याचा अर्थ काय? तुम्हाला नक्की आयुष्यात काय हवय? किंवा तुमच्या आयुष्यच ध्येय काय? बहुतेकांना त्याच समर्पक उत्तर देता येत नाही; कारण या गोष्टीचा आपण कधी विचारच केलेला नाही. आपण असेच जगत असतो. ध्येयहीन,दिशाहीन. बरेचजण मी दुसऱ्यांसाठी जगतो असं उत्तरही देतात. या सर्व उत्तरांमागे वैचारिक गोंधळ किंवा भावनिक असंतुलनचं बऱ्याच वेळा दिसत.

काही जण मान्य करतात की मला सुखी व्हायचचय, आनंदी व्हायचय; पण आनंदी,सुखी कस होणार, हे विचारल्यावर बऱ्याच लोकांची उत्तर मोठं घर घेतल्यावर, मुलीचं लग्न ठरल्यावर, खूप पैसे जमल्यावर, नवीन कार घेतल्यावर, अशी मजेशीर असतात. मुलीचं लग्न ठरल्यावर त्यांना विचारलं,तुम्ही आता आनंदी आहेत का, तर म्हणतात एकदा तिला गोंडस मूल झाल आणि तिच्या नवऱ्याची पुण्यात बदली झाली,की मग मी खरा आनंदी होईन. म्हणजे मी माझा आनंद नेहमी दुसऱ्या व्यक्तीवरच अवलंबून ठेवलेला आहे. कुठून आला माझ्यावर हा संस्कार? याच मूळ आपल्या लहानपणातच दडलेल आहे. लहानपणी मी चांगले मार्कर्स मिळवले, की आई-बाबा आनंदी,शिक्षक आनंदी आणि मग मी. म्हणजेच इतरांच्या आनंदावर माझा आनंद अवलंबून आहे, हा संस्कार तेव्हापासून पक्का झाला आहे. त्यामुळे आनंदासाठी मी नेहमीच इतरांवर अवलंबून राहू लागलो आणि आजच्या आयुष्यात मी आनंदी नसण्याचं ते प्रमुख कारण बनलं आहे.

आजच्या विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात पुष्कळनवीन  बाजारात उपलब्ध आहेत आहेत. पुष्कळजण विशेषतः तरुणवर्ग आपला आनंद या गॅजेट्समध्ये शोधत आहे. म्हणजेच आपण आपल आनंदी  असणं अश्या उपकरणावर अवलंबून ठेवल आहे. त्यातूनच इंटरनेट Addiction सारखे आजार दिसुन येऊ लागतात. वस्तुतः कोणतीही भौतिक वस्तू ही आपल्याला ‘कम्फर्ट’ देऊ शकते. उदाहरणार्थ, ‘लक्झरी कार’ मधला एसी आपल्याला कम्फटेबल फील देईल; पण आनंद देऊ शकत नाही. आपण ‘फिजिकल कम्फर्ट’ आणि हॅपिनेस याची गल्लत करत आहोत. यातून संस्कार असा होतो, की माझा आनंद कारवर अवलंबून आहे. म्हणजे कारमुळे मी आनंदी हे समीकरण मला चुकीचं वाटत. मोठं घर, कार,चैनीच्या इतर वस्तू या मला भोतिक सुख देऊ शकतील; म्हणजेच प्लेजर देतील; पण हॅपिनेस नाही. हे आपण समजून घेतलं पाहिजे.

समजा एका मोठया कारमध्ये आपण एखादी वाईट बातमी ऐकली, तर आपण लगेचच दुःखी होऊ. म्हणजेच ‘MY HAPPINESS OR SADNESS’ यांचा निर्माता मीच आहे. तो कोणत्याही भौतिक गोष्टींवर अवलंबून नाही. असे असते तर सर्व भौतिक ऐश्वर्य असलेले आज अत्यंत आनंदी व सुखी झाले असते. किंवा सर्वाना त्या बंगल्यात किंवा गाडीत तेवढाच आनंद झाला असता.

त्यामुळे उपभोग आणि आनंद यातील फरक आपण समजून घेतला पाहिजे. कोणतीही निर्जीव वस्तू ही फक्त निम्मितमात्र असते. म्हणजेच ती स्टिम्युलस म्हणून काम करते; पण नंतर होणारा आनंद ही माझी स्वतःचीच निर्मिती आहे.

हा आंतरिक आनंद माझ्या विचारांमध्येच दडलेला आहे. आपण खरा आनंद आजपर्यंत फार वेळा अनुभवलाच नसल्यान तो आपण बाहेर शोधत आहोत. वास्तविक या आनंदाचा निर्माता मीच आहे, हे कळणं अनुकरण केल्यामुळे तणाव, राग, दुःख, द्वेष अशा नकारात्मक भावना आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत, असं आपण मानून चाललो आहोत;  पण मी स्वतःला किती त्रास करून घ्यायचा,किती वेळा upset व्हायचं हे माझ्याच हातात आहे. याचा आपल्याला विसर पडलेला दिसतो. आपण मुळातच आनंदी आहोत, हे आपण विसरून गेलो आहेत.

या दिवाळीच्या निमित्त्यानं आपण आपल्या घराबरोबरच आपल्या मनाची स्वछता करण्याचा निश्चय करूयात, स्वतःची स्वच्छता म्हणजे आपल्या मनाची स्वछता म्हणजेच आपल्या सुखदुःखासाठी आपणच जबाबदार आहोत याचा मनोमन स्वीकार करण. घरातील डागांपेक्षा मनावर पडलेले डाग आधी पुसूयात.आपले विचार,प्र वृत्ती भावनांकडे मन:पूर्वक लक्ष देऊन त्यांची सफाई करूयात.

अविद्येची अमावस्या संपवून प्रेमाचा,ज्ञानाचा, शांतीचा दिवा लावून आपल्या आयुष्यात परिवर्तन घडविण्याचा आज निश्चय करूयात. अशी दिवाळी तुमच्या आयुष्यात अमर्याद आनंदाचा नक्की वर्षाव करेल, अशी मला खात्री आहेच;पण या सर्व गोष्टींचा मीच निर्माता आहे, ही जाणीव मात्र विसरू देऊ नका.

डॉ.मकरंद ठोंबरे.